
NANDED TODAY:06,Sep,2021 नांदेड : नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर जीवित हानीही झाली आहे .
त्यामुळे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे तात्काळ करून मृतांच्या नातेवाईकांना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी , लेंडी प्रकल्पातील बाधित गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे

अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन केली आहे.
नांदेडसह मराठवाड्यातील विविध विकासाच्या मागण्यांबाबत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांची भेट घेतली.
यावेळी माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव जाधव पाटील , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव साळवे, माजी नगरसेवक कृष्णा पापिनावर, गुलाब शुक्ला, प्रा. संदीप वाघ यांची उपस्थिती होती.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि राज्यपाल कोशारी यांच्या भेटीत खासदार चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या बाबतीत चर्चा केली.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे शिवाय अनेकांची जीवित हानी झाली आहे.
अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी हवालदिल झाला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित भागाचे तात्काळ पंचनामे करून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना तातडीची आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारला आदेशित करावेत.
जीवित हानी झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसह सन मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगाने मुदतवाढ आवश्यक असून महाराष्ट्राच्या विकासाचा समतोल राखण्यासाठी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ , विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाला
मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी यावेळी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
शिवाय नांदेड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणार्या लेंडी प्रकल्पातील बाधित 12 गावांच्या पुनर्वसनाचे आणि प्रकलपाचे रखडलेले काम

तातडीने पूर्ण करावे, मराठा आरक्षणावर राज्य सरकारची उदासीन भूमिका कारणीभूत असल्याने आपण स्वतः यात लक्ष देवून मराठा आरक्षण मिळवून द्यावे.
राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम राहावे यासाठीही सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणीही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी केली आहे.