
NANDED TODAY: 17,Feb,2021 नांदेड,(प्रतिनिधी)-ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित व दुर्लक्षित मागण्या या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी. शेजारील राज्यात जे महाराष्ट्र राज्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असूनही प्रतिमहा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना 2000 ते 2500 रूपये पेंशन तथा मानधन देतात. त्याच धर्तीवर या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात प्रतिमहा 3500 रूपये मानधन द्यावे आणि जागतिक पातळीवर, देशपातळीवर व महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यात 60 वर्ष वयोमर्यादा आहे ती मानविय न्यायाने मान्य करावी आदी व इतर मागण्याकडे सहानुभूतिने विचार करून मान्य करव्यात व त्वरित आणि तंतोतंत पणेअंमलात आणाव्यात म्हणून राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठाचा एक लक्षवेधी मुखपट्टी (मास्क बांधून) मोर्चा चे आयोजन दि.14 फेबु्रवारी 2021 रविवारी करण्यात आले होते.

पण राज्य शासन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साहेबांच्या आदेशाने स्थानिक पोलिस प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या नियोजीत लक्षवेधी मुखपट्टी (मास्क) मोर्चास परवानगी नाकारल्यामुळे मोर्चा रद्द करण्याचे कळवूनही मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक एकत्र जमले होते. दूरगम अशा ग्रामीण भागातून आलेल्या या नागरिकांना समजावून सांगने कठीणच काम होते. त्यासाठी स्वा.से.स्व.दादारावजी वैद्य सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीस उत्तर मराठवाडा विभाग ज्ये. ना.सं.फेस्कॉमचे अध्यक्ष सर्वश्री अशोक तेरकर, सोमावाड, माधवराव पवार, डॉ.संगेवार (लोहा), सोनुले, आनंदरावजी पाटील साळूंके, चंद्रकांतजी देशमुख, अॅड.खान, पठाण, डॉ.शितलताई भालके, श्रीमती प्रभा चौधरी, शततारकाताई, गिरामताई, अश्विनी जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ.शितलताई भालके यांनी केले. आनंदरावजी सोळूंके यांनी बैठकीचे स्वरूप मोठ्या सुंदर रितीने मांडले. ज्येष्ठ नागरिक चळवळीला वाहुन घेतलेले नेते डॉ.हंसराज वैद्य यांनी फेस्कॉम तथा आयस्कॉनचा लेखाजोखा व आजपर्यंत केलेली आंदोलने , आजची स्थिती , चळवळीची गरज आणि आता पुढील चळवळीची दिशा यावर विस्तृतपणे आपले मत मांडले.
शेवटी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, समाज व प्रशासन जर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष घालत नसतील तर भविष्यात ज्येष्ठ नागरिकांना आपल्या न्याय मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रसंगी विविध अशा प्रकारची अंदोलनें, मोर्चे, साखळी उपोषण तथा अन्नपाणी त्याग आंदोलनासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागतील असे म्हणताच बैठकीतील अनेक ज्येष्ठ महिला-पुरूष नागरिकांनी उत्स्फुर्तपणे तयारी दाखविली. अध्यक्षीय समारोप अशोक तेरकर यांनी विस्तृतपणे मांडला. श्रीमती शततारकाताईंनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. मेयर या औषध कंपनीने ज्येष्ठ नागरिकांना शक्तीवर्धक तथा रोगप्रतिकारक टॉनिकचे मान्यवरांच्या हस्ते वाटप केल्यामुळे विशष आभार मानले व बैठकीची सांगता झाली.