आंबा चोंढी स्टेशनच्या रेल्वे भुयारी मार्गाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्या – खासदार हेमंत पाटील

NANDED TODAY HINGOLI: 09,March,2021 हिंगोली : वसमत तालुक्यातील आंबा चोंढी येथील रेल्वे स्टेशनच्या नजीक आंबा गावात जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या भुयारी मार्गामुळे भविष्यात अडचणी निर्माण होऊ नये तसेच आंबा गावात जाणाऱ्या जुन्या रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.

पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर असलेल्या चोंढी स्टेशनजवळील गेट काढून तिथे भुयारी पुल उभारण्यात येत आहे. परंतु या भुयारी पुलामुळे आंबा गावचा प्रमुख रस्ता बंद होत आहे. तर भुयारी मार्ग छोटा असल्याने भविष्यात जवळपासच्या २० ते २५ गावातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

या संदर्भात रेल्वेकडे वारंवार तक्रारी करूनही गावकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गावकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे मांडले. दरम्यान, हेमंत पाटील यांनी भुयारी पूल होत असलेल्या ठिकाणी तात्काळ ग्रामस्थाना घेऊन पाहणी केली. त्याचवेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना काम चालू असलेल्या ठिकाणी बोलावून विविध सूचना केल्या.तसेच कामाबाबत निर्देश दिले.

ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे आंबा गावात जाणारा जुना रस्ता बंद न करता त्यास पर्यायी मार्ग तयार करून देणे, रेल्वे स्टेशन आंबा गाव आणि चोंढी स्टेशन वसाहतीच्या मध्ये असल्याने त्या ठिकाणी लोखंडी जिना बसवून देणे, जेणेकरून पटरी ओलांडून शाळेत जाणाऱ्या जवळपास हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल,

तसेच भुयारी मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने छोटा होत असल्याने तिथे जुनुना रेल्वे स्थानकाच्या समोर उभारलेल्या पुलाप्रमाणे दुहेरी भुयारी रस्ता करावा, भुयारी मार्ग ते आंबेकर यांचे शेतापर्यंत रस्ता पूर्ण करून द्यावा अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी खासदार हेमंत पाटील आणि उपस्थित रेल्वे अधिकारी यांच्याकडे केल्या. यावर तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे अधिकारी यांना केल्या.

यावेळी रेल्वे अधिकारी श्रीनिवासन, सहाय्यक अभियंता सुधाकर मालदोडे यांच्यासह पथकातील अधिकारी, कर्मचारी तसेच सरपंच संदीप भोसले, ज्येष्ठ नागरिक नानाराव भोसले, बबनराव भोसले, रामजी भोसले, शिवाजी भोसले, दिनकर भोसले, श्रीनिवास भोसले, बंडू अण्णा भोसले, अविनाश भोसले, भारत भोसले, व्यंकट भोसले, बबनराव बालगुडे, यादव शिंदे, संतोष भोसले, प्रतिक भोसले, संजय भोसले, राजू भोसले आदि उपस्थित होते.

Total Page Visits: 218 - Today Page Visits: 2

Leave a Reply