
NANDED TODAY:23,March,2021 नांदेड- कोरोना चा प्रादुर्भाव शहरांमध्ये गतीने वाढत असल्याने नांदेड उत्तर चे शिवसेनेचे आ. बालाजी कल्याणकर यांनी गुरुगोविंद सिंग शासकीय जिल्हा रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालय येथे जाऊन आढावा घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिनी ईटंनकर यांच्यासोबत देखील चर्चा केली आहे. कोरोणा रुग्णांचा वाढता आकडा नियंत्रणात आणणे,
जलद गतीने लसीकरण करणे तसेच लॉकडाउन बाबत आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. येथील परिस्थितीबाबत आ. बालाजी कल्याणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच पालकमंत्री अशोक चव्हाण यांना माहिती देणार असून अडचणी तात्काळ सोडविणार असल्याचे सांगितले आहे.

दोन दिवसापूर्वी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आ. बालाजी कल्याणकर यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र उभारणे तसेच तपासणी केंद्र उभारण्याची मागणी केली होती. यावर प्रशासनाने तात्काळ प्रभागनिहाय कोरोणा तपासणी केंद्र उभे केले आहेत. तसेच लसीकरणाच्याही केंद्रात वाढ केली आहे. आ. बालाजी कल्याणकर यांनी वाढत्या कोरोना रुग्णांचे प्रमाण चिंतेचा विषय असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्याकडे मांडले आहे.
यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी गुरुगोविंदसिंग शासकीय जिल्हा रुग्णालय येथील कोरोणा रुग्ण असलेल्या वॉर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी रुग्णांना पोषक आहार देण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला केल्या. अतिगंभीर रुग्णावर रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा वापर करण्याबाबत सूचना केल्या आहेत. या इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी सांगतातच, आ. बालाजी कल्याणकर यांनी वरिष्ठ पातळीवरील वैद्यकीय विभागाला फोन करून विचारणा केली.
पुढील दोन दिवसात रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात शहरात पाठविण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच रुग्णांची योग्य ती काळजी घेऊन पुढील काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही याची काळजी येथील वैद्यकीय विभागाने आत्ताच घ्यावी अशा सूचना केल्या. यानंतर आ. बालाजी कल्याणकर यांनी आयुर्वेदिक महाविद्यालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिनी ईटंनकर यांना माहिती दिली.
तसेच लॉकडाऊनच्या नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली. लॉकडाऊन बाबत काय नियोजन केले आहे, तसेच आगामी काळात रुग्णांना खाटा उपलब्ध होतील का याबाबत जिल्हा पातळीवर काय नियोजन झाले आहे, याचा आढावा घेतला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे आ. बालाजी कल्याणकर यांनी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता,
नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करावे लागेल. आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, याची खबरदारी आत्ताच घ्यावी लागेल अशा सूचना केल्या तसेच सध्याच्या अतिगंभीर रुग्णावर रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा वापर करण्याबाबत ही सूचना केल्या आहेत.
अतिदक्षता विभागात नव्या 60 खाटा
गुरुगोविंदसिंग शासकीय जिल्हा रुग्णालय येथे सध्या अतिदक्षता विभागात 250 खाटा आहेत. वाढत्या रुग्णान संख्येचा अंदाज घेऊन नव्याने 60 खाटा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. याचाही आढावा आ. बालाजी कल्याणकर यांनी घेतला आहे.