
NANDED TODAY:10,Feb,2021 नांदेड,(प्रतिनिधी)-शहरी व ग्रामीण सर्व भागात प्रत्येक कुटूंबात किमान एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत. एकुण लोकसंख्येच्या जवळजवळ 18 टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आजपर्यंत आपले कुटूंबासह समाज, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे. नैसर्गिकरित्या वयोमानाने त्यांच्यातील क्रयशक्ती कमी झाली आहे. ते आता कमविते राहिलेले नाहीत. शहरापेक्षा ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यातही विधवा ज्येष्ठांची संख्या लक्षणीय आहे. ज्येष्ठ नागरिक हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जगत आहेत. काहींची मुलं, मुली शिक्षणासाठी व व्यवसायासाठी ज्येष्ठांना सोडून शहरात किंवा देशाबाहेर गेलेली आहेत. काही ज्येष्ठ नागरिक कुटूंबास ओझे आहेत व त्यांचा छळ पण केला जातो आहे. पोषण करण्याऐवजी त्यांची पिळवणूक करण्यात येत आहे. त्यांच्याकडे पाहण्यासाठी कोणीही तयार नाही. रक्ताचे कुटूंबीय, समाज, राज्य शासन वा केंद्र शासन सर्वजण त्यांचेकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोकप्रतिनिधीना ज्येष्ठाकडे सहानुभूतीने पाहण्यास वेळ नाही. निसर्गही कोपला आहे. अवर्षण, अतिवृष्टी, वादळ, कोरोनासारखी महामारीचा उद्रेक याने ज्येष्ठ त्रस्त झालेले आहेत. काहीना रक्तदाब, मधुमेह, दमा, संधिवात, कर्करोग आदी वयोमानानुसारचे आजारपण त्रास देत आहे. परिणामतः ज्येष्ठ पूर्णपणे कोलमडले आहेत. ज्येष्ठांना कोणीही वाली नाही.
अशा परिस्थितीत महाराष्ट्रात फेस्कॉमने ज्येष्ठांच्या मागण्यासाठी सरकारकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला आहे. पण कोणीही प्रतिसाद देत नाही व सहानुभूतीपण दाखवत नाही.
ज्येष्ठांच्या प्रलंबीत प्रमुख मागण्या
1. ज्येष्ठ नागरिक धोरण मान्य करून तंतोतंत त्वरित अंमलबजावणी करणे. 2. ज्येष्ठांची वयोमर्यादा 60 वर्षे मान्य करणे. 3.इतर राज्याप्रमाणेच विना अट उपेक्षित, दुर्लक्षित तथा गरजू ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहा किमान 3500 रूपये (दोन वेळचे जेवण व चहापाणी) मान्य करून चालू करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणे. 4. आरेाग्यदायही योजनेसाठी दारिद्रय रेषेखालील असलेली बंधनकारक अट रद्दबातल करणे. 5.प्रवास दरात 50 टक्के सवलत व शासन मान्य ज्येष्ठ नागरिक पत्र तथा आधार कार्डच ग्राह्य धरणे आणि इतर जुजबी मागण्या मान्य करणे व अंमलात आणणे.
सध्या राज्य शासन आणि केंद्र शासन यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने ज्येष्ठांच्या मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद नांदेडच्यावतीने येत्या 14 जानेवारी रोजी लक्षवेधी मुखपट्टी मोर्चाचे आयोजन सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.हंसराज वैद्य व महिला विभाग अध्यक्षा डॉ.शितल भालके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. करोना महामारीचे बाबतीत सर्व दक्षता घेवून सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. सामान्य जनतेस व कार्यालयीन कार्यात अडथळा येऊ नये म्हणून मोर्चा रविवारी निघणार आहे. मोर्चा वजिराबाद चौक, छत्रप्ती शिवाजी महाराज पुतळा, लाल बहादुर शास्त्री पुतळा आणि महात्मा गांधी पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाणार आहे व मागण्याचे निवेदन मा.जिल्हाधिकारी मार्फत शासनास देण्यात येणार आहे. या मोर्चात सुमारे दीड ते दोन हजार ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिक प्रेमी महिला पुरूष सहभागी होणार आहेत.
मेयर (चएधएठ) या नामांकित औषधी कंपनीने नऊ लक्ष चोपन हजार किंमतीच्या जिवनसत्वाच्या (टॉनिक) गोळ्यांचे ज्येष्ठ नागरिकांना विनामुल्य औषधी देण्याचे मान्य केले आहे.
या मोर्चाप्रसंगी ज्येष्ठांनी कुटूंब, समाज, देशाप्रती आजपर्यंत केलेल्या योगदानाच्या ऋणातून उतराई होणेकामी मेयर (चएधएठ) या औषध कंपनीने दान देऊ केलेल्या जीवनसत्वाच्या प्रत्येकी एक महिना पुरतील एवढ्या गोळ्यांचे विनामुल्य वाटप कंपनीच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सर्व ज्येष्ठांनी व ज्येष्ठ नागरिक प्रेमींनी वेळेवर हजर राहून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.हंसराज वैद्य यांनी केले आहे.
आपला,
डॉ.हंसराज वैद्य, अध्यक्ष सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ. 7887833198