
NANDED TODAY:12,Feb,2021 — वीज कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा करून, सवलत देण्याबाबत केलेल्या सूचना – नांदेड-वीज वितरण कंपनीने मागील चार दिवसापासून कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा धडाका लावल्याने अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकर्यांसमोर पडल्याने अनेक शेतकर्यांनी आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे धाव घेऊन समस्या मांडल्या आहेत. याबाबत आ. बालाजी कल्याणकर यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संतोष वहाने यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना थकित वीज बिलापोटी सवलत देऊन चालू बिलाची बाकी भरणा केल्यास वीज पुरवठा सुरळीत करावा असे निर्देश दिले. वीज वितरणाच्या अधिकार्यांनीही चालू बिलाची बाकी घेण्याचे मान्य केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कृषिपंपाची

थकबाकी असल्याने, वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम चार दिवसापासून सुरू करण्यात आली आहे. थेट रोहीयंत्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित केला जात, असल्याने शेतकऱ्यांना कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. सध्या गहू, हरभरा, भुईमूगा साठी पाणी गरजेचे आहे. परंतु पाणी देण्याचा काळ असतानाच वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. इकडे शेतातील पिकांना पाणी देता येईना तर दुसरीकडे अनेक गावात वीज पुरवठा अभावी पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकर्यांनी आ. बालाजी कल्याणकर यांची भेट घेऊन या अडचणीतून तोडगा काढण्याची मागणी केली. आ. बालाजी कल्याणकर यांनी याबाबत विलंब न करता अधीक्षक अभियंता संतोष वहाने, कार्यकारी अभियंता जे.एम. चव्हाण, कार्यकारी अभियंता एस. पी. बाहेती, सहाय्यक अभियंता सूर्यतळे, महाजन, खंदारे यांना आपल्या कार्यालयात बोलावून शेतकऱ्यांना सवलत देण्याबाबत सूचना केल्या. याबाबत महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील सवलत देणार असल्याचे सांगितले असून शेतकऱ्यांनी देखील आपले वीज बिल भरून घेण्याचे आवाहन महावितरण विभागाकडून करण्यात आले आहे. आ. बालाजी कल्याणकर यांनी कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन बंद न करता त्यांना सवलत देण्याचे निर्देश दिल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे.