
NANDED TODAY:3,May2021 नांदेड – हिंगोली जिल्ह्यातील वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी के.डी. देशमुख यांनी वन विभागात अत्यंत धाडसी, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणे तब्बल ३४ वर्षे अत्यंत चोख सेवा बजावली. संपूर्ण कारकिर्दीत निष्कलंक राहून आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारे के.डी. देशमुख यांच्यासारखे अधिकारी खूपच अपवादात्मक आढळतील. त्यामुळे त्यांची कारकिर्द वन विभागातील अधिकारी कर्मचार्यांना सदैव प्रेरणा देत राहील.
के.डी. देशमुख यांनी प्रभारी सहाय्यक वन संरक्षक श्रेणी-१ सामाजिक वनीकरण विभाग हिंगोली येथील काही काळ पदभार सांभाळला व बर्याच कर्मचार्यांना त्यांनी शिस्त लावून वृक्ष लागवडीचे कामे दर्जेदार करुन घेतले (हे विशेष) असे गौरवोद्गार हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी मनिषा पाटील यांनी काढले.
३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवा काळ पूर्ण करुन वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी कळमनुरी जि. हिंगोली विभागातून ३० एप्रिल २०२१ ला सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार व निरोप समारंभात विभागीय वन अधिकारी मनिषा पाटील बोलत होत्या. कोरोना महामारीमुळे लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम मोजक्या अधिकारी- कर्मचार्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
हिंगोली वन विभागातील अधिकारी- कर्मचार्यांशी जिव्हाळ्याने वागणारे के.डी. देशमुख बारडकर, शांत, संयमी, परोपकारी आणि कोणालाही अडचणीत मदत करणारे अधिकारी म्हणून परिचित आहेत. आपल्या प्रदीर्घ ३४ वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी चंद्रपूर, नांदेड, हिंगोली अशा विविध जिल्ह्यात अत्यंत उत्कृष्ट सेवा प्रदान केली. वनविभागात शासनाची नोकरी करीत असताना आपल्यावर सोपविलेली प्रत्येक जबाबदारी के.डी. देशमुख यांनी चोखपणे पार पाडून आपल्या विभागाचा लौकिक वाढविला.
त्यामुळे शासनानेही त्यांच्या कार्याची दखल घेऊन वेळोवेळी के.डी. देशमुख यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. कामे करण्याची जिद्द, निष्ठा आणि तत्परता यामुळे नांदेड- हिंगोली वन विभागात के.डी. देशमुख बारडकर हे दबंग अधिकारी म्हणून ओळखले गेले. सन १९८६ मध्ये जालना जिल्ह्यात ते सर्वप्रथम सहाय्यक लागवड अधिकारी म्हणून वन विभागाच्या सेवेत दाखल झाले.
ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर येथे २००७ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची नांदेड वनविभाग येथे बदली झाली. नांदेड वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालया अंतर्गंत येत असलेल्या भोसी येथे वन परिमंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड योजना, वन तस्करीला आळा घालून वनसंपत्तीचे रक्षण करणे अशा विविध कार्यातून त्यांनी वन विभागाला चांगली ओळख मिळवून दिली. सन १९९२ ते २००४ या काळात के.डी. देशमुख यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल तेथील तत्कालीन पालकमंत्री दिवंगत एकनाथराव गायकवाड तसेच दिवंगत सिनेअभिनेते निळू फुले यांच्या हस्ते त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शिवाय चंद्रपूर जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार, स्मृतीशेष एम.पी. भवरे गुरुजी सेवाभावी संस्थेचा कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणचा समता गौरव पुरस्कार असे किती तरी पुरस्काराने के.डी. देशमुख यांना सन्मान प्राप्त झालेले आहेत. ईतकेच नव्हे तर २०१७ मध्ये के.डी. देशमुख भोकर येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना बेंबर ता. भोकर येथे राबविलेल्या वनग्राम योजनेला राज्यातून दुसरा क्रमांक मिळवून दिल्याबद्दल राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला,
अशी दैदिप्यमान ३४ वर्षाची प्रदीर्घ सेवा कारकिर्द पूर्ण करुन वनपरिक्षेत्र अधिकारी के.डी. देशमुख नुकतेच सेवानिवृत्त झाले. निरोप समारंभ प्रसंगी सत्काराला उत्तर देताना के.डी. देशमुख म्हणाले की, नांदेड, हिंगोली वन विभागात काम करीत असताना वरिष्ठांपासून ते कर्मचार्यांपर्यंत चांगले सहकार्य मिळाले.
येथील लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी विश्वास दाखविल्यामुळे चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळाले. या सर्वाचा मी ऋणी असल्याचे त्यांनी अत्यंत भावूकपणे नमूद केले.. के.डी. देशमुख यांना त्यांच्या निरोप समारंभप्रसंगी त्यांना भावी आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो अशा शब्दांत सत्कार सोहळ्यास उपस्थित अधिकार्यांनी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा दिल्या.