
शिक्षण घेण्यासाठी जे कष्ट स्वतःला झाले ते आपल्या परिसरातील गोर गरीब मुलांना होऊ नयेत यासाठी आपल्या मूळ गावी मुळकी उमरगा येथे वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी पहिली शाळा काढून भागीरथ याप्रमाणे शिक्षण गंगेला ग्रामीण धरतीवर प्रवाहित करण्याचे कार्य केले. व हीच पुढे येणाऱ्या सुवर्णयुगाची नांदी होती. यानंतर गुरुजींनी कुमठा, रोकडा सावरगाव, अहमदपूर, धनेगाव, कबन सांगवी, धामणगाव,मुरडव अशा ग्रामीण भागात शाळा व वसतिगृह काढून गोरगरीब मुलांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली. समाजासाठी काही तरी चांगले करण्याची महत्त्वाकांक्षा ,प्रबळ इच्छाशक्ती ,आत्मविश्वास, सकारात्मकता तसेच अथक परिश्रम करण्याची जिद्द या बळावर अध्यात्मिक गुरु राष्ट्रसंत, वसुंधरा रत्न, प,पू.डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज माजी आमदार लिंगप्पा सांगवीकर, डॉ. मनोहर कृष्णराव देशमुख यांच्या सहकार्याने आपले कार्यक्षेत्र उजळून टाकले. अनेक गुणवत्तापूर्ण शाळा स्थापन करून सबंध महाराष्ट्रात अहमदपूर पॅटर्न एक नवी ओळख निर्माण केली. सर्वांसाठी योग, खादीचा वापर, संस्कारक्षम शिक्षण, माता पिता आधार योजना, मूल्यशिक्षण अशा अनेक कार्यातून शिक्षण महर्षी म्हणून गुरुजींची ओळख निर्माण झाली. समाजकारण असो वा राजकारण, नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे, गरिबीची व दीन दुबळ्यांची जाण ठेवणारे लोक नायक, कधीही कोणत्याही संकटाला न घाबरणारे ,ताठ मानेने पुढील प्रवास करण्याची प्रेरणा देणारे लोहारे गुरुजी खऱ्या अर्थाने लोकनायक बनले.

माणसे पारखण्याची उत्तम कला, दूरदृष्टी, उत्कृष्ट स्मरण शक्ती, अफाट बुद्धिचातुर्य, उत्साही दिलखुलास व्यक्तित्व असणारे गुरुजी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आत्मविश्वासाने काम करणारे दिलदार संस्थाचालक चांगल्या कार्यासाठी सदैव तत्पर विद्यार्थीप्रिय समाज प्रिय शिक्षक मुख्याध्यापक ते संस्था सचिव अशा भूमिका पार पाडणारे खरे कर्मवीर म्हणून ज्यांचा उल्लेख करावासा वाटतो ते लोहारे गुरुजींच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पण “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” प्रमाणे पुरस्काराची लालसा यांनी कधीच केली नाही. निस्वार्थपणे फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने ते कार्य करत राहिले. गुरुजींनी आयुष्यात नेहमी मानवतेला महत्त्व दिले. संत सानिध्य व महान विभूतींच्या विचारांवर चालत मानवी आयुष्य फुलवण्याचे कार्य केले. त्यांच्या या महान वाटचालीत अर्थातच त्यांच्या अर्धांगिनी सौ. पुष्पा ताई लोहारे यांचा वाटा तितकाच महत्त्वाचा .गुरुजींच्या कार्याला शब्दबद्ध करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे !!आज गुरुजींच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त गुरुजींना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!!( महादेव शरणप्पा खळुरे कलाशिक्षक यशवंत विद्यालय अहमदपूर)