
NANDED TODAY:12,Feb,2022 नांदेड – बुद्धाने अडिच हजार वर्षांपूर्वी सांगितल्या प्रमाणे दान पारमिता करणारे बौद्ध उपासक उपासिका आजही वर्तमानात असल्याचे सुतोवाच तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे
संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. भिक्खूंना राहण्यासाठी दत्ता बाबा वाघमारे यांच्या स्मरणार्थ अनिता सोनकांबळे आणि मिलिंद सोनकांबळे या बौद्ध दांपत्याने भिक्खू निवास बांधून ते भिक्खू संघास दान दिले आहे. या लोकार्पण

प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते श्रद्धानंद, भंते सुदत्त, भंते सुनंद, भंते शिलभद्र, भंते सुयश, भंते सुनंद, भंते सुमेध यांच्यासह शांताबाई सोनकांबळे, सावित्रीबाई वाघमारे, छाया सुर्यवंशी, चौतराबाई सोनसळे, वैशाली सोनसळे, सारिका वाघमारे, सुमन बोरीकर यांचीउपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याचनेनंतर भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. पुढे बोलताना भदंत पंय्याबोधी म्हणाले की, बुद्धाने सांगितले
की, माणसाने दुसऱ्यांच्या भल्यासाठी, स्वतःची मालमत्ता, स्वतःचा देह म्हणजेच प्राणत्याग करणेही दान पारमिता होय. कुशल कर्म माझ्याकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंब थेंब पडून ज्याप्रमाणे पात्र भरत असते त्याप्रमाणे थोडे थोडे कुशल

कर्म करीत राहिल्याने मोठे कुशल कर्म घडून येते. त्यामुळे माणसाचे आयुष्य वाढते. आरोग्य चांगले राहते. मानवाला सुख प्राप्त होते व बळ मिळते. बुद्धाच्या काळात राजा बिंबिसाराने भिक्खू संघाला वेळूवन दान दिले. आम्रपालीने आम्रवन दान दिले.

अनाथपिंडकाने सोन्याच्या मोहरा अंथरुन जेतवन विकत घेतले आणि बुद्धाला म्हणजेच संघाला दान दिले. हाच आदर्श ठेवून खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. सोनकांबळे दांपत्याने केलेल्या या त्यांच्या कुशल
कर्माने बुद्धकालीन दान परंपरेला जिवंत केले. या त्यांच्या उच्च कोटीच्या धार्मिक कार्यामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्या प्रति मंगल कामना व्यक्त होत आहेत.