
NANDED TODAY: 07,March,2021 नांदेड प्रतिनिधी – जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दि.03 मार्च 2021 रोजी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखालील दु.3.00 वाजता पार पडली. महामार्ग पोलीस, नांदेड यांनी खा.चिखलीकर यांच्याकडे रुग्णवाहिकांची मागणी केली. यावेळी खा.चिखलीकर यांनी तात्काळ खासदार निधीतून 2 रुग्णवाहिका देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये रस्ता सुरक्षा व रस्त्यावरील अपघातांची कारणे, अपघातांची संख्या कमी करण्यासाठी सूचना व उपाययोजना, रस्ता सुरक्षा मोहिमेमध्ये फोरईएस प्रोग्रामची अंमलबजावणी करणे, वाहनांच्या वेग मर्यादेवर व वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करणे, अपघातग्रस्तांना मदत करणा-यांना व्यक्तींना प्रोत्साहन देणे.
तसेच गतिरोधक, दिशादर्शक या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होवून त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनचालकांसाठी प्रबोधन कार्यशाळा, सुरक्षित वाहन चालविण्याची माहिती देणे, ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टर- ट्रेलर व ट्रकना रिफलेक्टर लावणे, वाहन तपासणी करणे, रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर घेणे, जिल्ह्यातील ट्रक, बस, स्कूल बस, वाहन चालक व मालक यांना मार्गदर्शन करणे यासह इतर सूचना समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या आहेत.
यावेळी अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात पोहचविण्यासाठी रुग्णावाहिकेची गरज लक्षात घेवून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तात्काळ 2 रुग्णवाहिका महामार्ग पोलीस केंद्रासाठी खासदार निधीतून देणे संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना सूचित केले.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, रस्ता सुरक्षा समिती सदस्य शैलेश क-हाळे, निखील लातूरकर, नरेंद्र गायकवाड, आनंद मनाळकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड शैलेश कामत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, राष्ट्रीय महामार्ग प्रमुख सुनिल पाटील, शहर वाहतूक शाखा प्रतिनिधी चंद्रशेखर कदम यासह इतर विभागाचे प्रमुख सदर बैठकीस उपस्थित होते.