
NANDED TODAY:23,Sep,2021 काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळण्याची
आशा ओबीसी समाजातून व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसच्या वतीने राजीव सातव यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळू नये म्हणून राज्यातील प्रस्थापित काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत लॉबिंग केले आणि रजनी पाटील यांना तिकीट देण्यास भाग पाडले. स्वतःला ओबीसी नेता म्हणवणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
किंवा छगन भुजबळ यांच्यासारखे ओबीसीनेते सुद्धा ओबीसी नेत्याच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ओबीसी उमेदवार देऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातील माळी समाजाच्या विविध संस्था, संघटनांच्या वतीने
या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यात येत असून
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सुद्धा माळी समाजाच्या या भूमिकेचे समर्थन करीत आहोत. त्याचबरोबर ओबीसीना डावलण्याच्या प्रस्थापित पक्षाच्या भूमिकेचा जाहीर निषेध करीत आहोत.
एखाद्या नेत्याच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची प्रथाच मूळतः काँग्रेसमध्ये पूर्वापार चालत आलेली आहे. मात्र ही प्रथा काँग्रेसमधील प्रस्थापित घराण्यांसाठीच

असल्याचे दिसून येत आहे. राजीव सातव यांच्यासारखा दिल्ली दरबारी वलय असलेला तरुण ओबीसी चेहरा काँग्रेसने गमावला आहे. खरंतर खासदार असलेल्या राजीव सातव यांना महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा योग्य उपचार देऊन वाचवू शकले नाही हेच न पटणारे आहे.
काँग्रेसकडे असलेली यंत्रणा वापरून त्यांनी राजीव सातव यांचे प्राण वाचवायला हवे होते. मात्र पुण्यात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या
चारही पक्षांनी मिळून ओबीसी आरक्षणाची वाट लावली आहे. दुसरीकडे हे सर्व पक्ष ओबीसीचे कैवारी असल्याचे स्वतःला सांगत आहेत. ओबीसींना नेतृत्व देण्याच्या वल्गना करीत आहेत मात्र प्रत्यक्षात ओबीसी

खासदाराच्या मृत्युने रिक्त झालेल्या जागेवर ओबीसी उमेदवाराला उमेदवारी नाकारत पूर्वी खासदारकी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद, केंद्रीय समाज कल्याण मंडळावर सदस्यत्व उपभोगलेल्या व
आता विधान परिषदेसाठी प्रतीक्षेत असलेल्या रजनीताई पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा घाट काँग्रेसने घातलेला आहे. ओबीसी समाजाने काँग्रेसची ही खेळी ओळखावी आणि वेळीच सावध व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात येत आहे.