
NANDED TODAY:03,August,2021 नांदेड – सीटू संलग्न घर कामगार संघटनेच्या वतीने दिनांक ३ आॕगस्ट रोजी घरेलू कामगारांच्या प्रलंबीत मागण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर झालेल्या धरणे आंदोलनात हजारो धूणी भांडी व घरकाम करणाऱ्या महिलांनी सहभाग नोंदविला.
राज्य सरकारने घरेलू कामगारांना सानुग्रह अनुदान स्वरूपात दीड हजार रूपये मंजूर केले असून कामगार कार्यालयात कामगारांची नोंद अद्यावत नसल्यामुळे प्रत्यक्ष काम करणारे कामगार अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली

आहे.या पूर्वी दिनांक १२ जुलै रोजी सीटूच्या वतीने आॕफ लाईन अर्ज भरण्याची मोहीम राबवत कामगारांची नोंद करून घेण्यास कामगार कार्यालयास भाग पाडले होते. असंघटित कामगार विकास आयुक्त महाराष्ट्र राज्य यांची मुंबईत भेट घेऊन
आॕफ लाईन अर्ज स्विकारणे,जाचक अटी रद्द करून सरसकट कामगारांना अनुदान मिळावे या साठी निवेदन दिले होते. नांदेड सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात किमान सहा टेबल व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून अर्ज स्विकारावेत

व कामगार मंडळाच्या सर्वच कल्याणकारी योजनाची अमलबजावणी करावी तसेच केरळच्या धर्तीवर कर न भरणा-या सर्व कामगारांना दरमहा सात हजार पाचशे रूपये अनुदान देण्यात यावे. या सह अनेक मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात
आले.आंदोलनात इतरही मागण्या करण्यात आल्या असून सीटूच्या रेल्वे स्टेशन सफाईदार युनिटच्या महिलांचे दोन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देत जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले व त्यांच्या तक्रारी नुसार कारवाई

करण्यात यावी अशी लेखी मागणी केली आहे. या सह नांदेड विद्यापीठातील राहिलेल्या सात सफाई कामगारांना कामावर घ्यावे.श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथील कर्मचाऱ्यांना तातडीने वेतन श्रेणी निश्चित करून कायम आदेश देण्यात
यावे. कुंडलवाडी ता.बिलोली येथील नगर परिषदेच्या सफाई व इतर कामगारांना ठेकेदार उपलब्ध होण्याची वाट न पहाता तात्काळ कामावर घ्यावे व तेथील जनतेचे आरोग्य धोक्यात आणू नये तसेच कामगारांना किमान वेतनाची पूर्तता करावी. दि.
सात जुलै रोजी वयोवृद्ध रूग्ण श्री यादव गायकवाड यांच्यावर वेळेवर उपचार न करणाऱ्या एसजीजीएस दवाखाना नांदेड येथील डॉक्टर,वाचमन,कंपाऊंडर व परिचारीकेवर कारवाई करावी.सर्वे नंबर ५६ बी वजिराबाद येथील जमीन मालक अल्का गुल्हाने यांना मंजूर मावेजा अदा करावा व भूसंपादन विभागातील श्री झाकडे
व इतर त्रासदायक लोकांवर सीबीआय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.आंदोलनाचे नेतृत्व घरेलू कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले व घरेलू कामगारांच्या स्थानिक मागण्या
व मंजूर रक्कम बँक खात्यावर चार दिवसांत जमा केली नाहीतर येत्या ९ आॕगस्ट क्रांतीदिनी मुख्य रस्ता अडवून चक्का जाम करणार असल्याचे सांगितले.
जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभणे आणि घरेलू कामगार संघटनेच्या सचिव
कॉ.ऊज्वला पडलवार यांनी देखील सरकारला धारेवर धरत प्रखर शब्दांत टीका केली.
आंदोलना मध्ये संघटनेच्या कार्याध्यक्ष कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.सुंदरबाई वाहूळकर,कॉ.लता गायकवाड,कॉ.कुसूम लोणे,निकीता
आडते,सचिन वाहुळकर,कॉ.संतोष शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.
तर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भाकप युनायटेडचे कॉ.प्रा.देवीदास इंगळे व कॉ.गोपाळ वाघमारे आंदोलन संपे पर्यंत सोबत होते.