राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या केंद्रबिंदुशी!’ – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या केंद्रबिंदुशी!’

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या केंद्रबिंदुशी!’

Spread the love

NANDED TODAY:27,June,2021 या संवाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांनी आज चौथ्या दिवशी नांदेड येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी सत्तेची भूक असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का, असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला.

सत्ता आली किंवा खुर्ची मिळाली तरच काम करणार, फडणवीस यांचा हा हट्ट योग्य नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांनी असे वक्तव्य केलेले नाही, याचीही आठवण मा. जयंत पाटील यांनी करून दिली. तसेच भाजपला सत्तेत येण्याची गरज नाही, राज्यातील जनतेने त्यांना नकार दिला आहे, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचा भाजपला आज कळवळा निर्माण झाला आहे. मात्र त्यांच्यामुळे भुजबळ साहेबांना तुरुंगात खितपत पडून राहावे लागले होते. एकनाथ खडसेंसारखे ओबीसी नेते पक्षातून बाहेर काढले गेले. एकंदरीत भाजपमध्ये ओबीसी नेतृत्व राहणार नाही, असा प्रयत्न भाजपकडून झाला आहे. यातून ओबीसी समाजाची चळवळच संपवण्याचं काम करण्यात आलं, असा गंभीर आरोपही ना. जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.

ओबीसी आरक्षणावर भुजबळसाहेबांनी समाधान शोधण्याची विनंती भाजपकडे केली आहे. मात्र यावर मार्ग न काढता फडणवीस मला सत्ता दिल्यावर प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका मांडतात. म्हणजेच सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, यावर लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम केंद्र सरकारच्या एजन्सीमार्फत होतंय अशी भीती ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करू शकतो त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पद्धतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल असे ते म्हणाले.

NIA ने मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या दृष्टीने मेन टार्गेट ठेवले पाहिजे. परंतु त्याऐवजी अटक झालेल्या व्यक्तीकडून काही वदवून घेऊन त्यादृष्टीने सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार सत्ताधारी भाजपने सुरू केलाय, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

कुणीतरी ‘अ’ आणि ‘ब’ चं नाव घेत असेल आणि त्यावर कारवाई होत असेल तर ही अत्यंत चुकीची पद्धत असल्याचे ते म्हणाले.राज्यात मागील सरकारच्या काळात राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेते कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता. त्या तुलनेत कामाचा दर्जा अत्यंत तकलादू असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

या योजनेत ७२ टीएमसी पाणी अडवल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु ७२ टीएमसी पाणी म्हणजे एका धरणाचे पाणी आहे. अशी परिस्थिती कुठे पहायला मिळालेली नाही. त्यामुळे या योजनेच्या कामावर लोक समाधानी नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, डॉ. सुनील कदम उपस्थित होते.

0
Total Page Visits: 843 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top