NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या
95 बालकांची टुडी ईको तपासणी

ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र 24 बालकांवर लवकरच मुंबई येथे उपचार



नांदेड, 17 जुलै :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची 2 डी इको तपासणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नांदेड येथे नुकतीच करण्यात आली. या शिबिरात नांदेड जिल्ह्यातील एकूण 95 बालकांची तपासणी करण्यात आली असून बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र एकूण 24 बालकांची शस्त्रक्रिया ऑगस्ट महिन्यात करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर अप्पनगिरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या नेवृत्वात्वाखाली  हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 डी इको तपासणी करण्यात आली.  ही तपासणी बालाजी रुग्णालय, मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. जयश्री मिश्रा आणि रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडले.

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुन्य ते 18 या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात.

हृदयरोग तपासणी, नेत्ररोग, आकडी/फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजित करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमांचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.

तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत शुन्य ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळल्यास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे. या शिबिरासाठी RBSK जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, DEIC चे व्यवस्थापक विठ्ठल तावडे,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
00000