NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

वर्ष 2024 डिसेंबर महिन्याच्या कामगिरीत कुरुंदा पोलीस ठाणे नांदेड परिक्षेत्रात अव्वल.!

नांदेड परिक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस कामकाजाशी संबंधित विषयावर दर महिन्यास परिक्षण करुन त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याची योजना नांदेड परिक्षेत्रात सुरु करण्यात आली आहे.

गुन्हे निर्गती, गुन्हे उघडकीस आणण्याचे व मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण, अर्ज चौकशी, चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, समंस व वॉरंट बजावणी, फरारी व पाहिजे असलेले आरोपी अटक करणे, प्रतिबंधक कार्यवाही, दोषसिद्धी, सीसीटीएनएस, अभिलेख अद्ययावतीकरण, अवैध व्यवसाय विरोधी कारवाई इत्यादी बाबत प्रत्येक पोलीस स्टेशनने केलेल्या कामगिरीचे दरमहा परीक्षण करण्यात येत आहे.

उपरोक्त महत्त्वाच्या विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन पोलीस ठाण्यांना प्रत्येक महिन्यास अनुक्रमे 3000, 2000 व 1000 रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येते.

परिक्षेत्रातील एकूण 91 पोलीस ठाण्यांचे डिसेंबर महिन्याच्या कामगिरीचे परीक्षण केले असता त्यात, हिंगोली जिल्ह पोलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शना खाली हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा पोलीस ठाण्याने सर्वच विभागात सरस कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

त्याचप्रमाणे, नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याने द्वितीय तर हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. नागरिकांकडून पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या प्रकरणांचा शिघ्रतेने निपटारा होण्यासाठी व पोलीसांचे कामकाज अधिक जनताभिमुख होऊन,

त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढीस लागावी या दृष्टिकोनातून पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांच्या परीक्षणाची सदर योजना सुरू केली आहे. डिसेंबर महिन्यात, उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावणारे कुरुंदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री रामदास निरदोडे,

द्वितीय क्रमांक पटकावणारे सोनखेड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री पांडुरंग माने त्याचप्रमाणे, तृतीय क्रमांक पटकावणारे बासंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. विकास आडे यांचा पोलीस उप महानिरीक्षक यांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. कुरुंदा ,सोनखेड व बासंबा येथील प्रभारी अधिकाऱ्यांना संबधित पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या

अधिकारी व अंमलदारांची मोलाची साथ लाभली असल्याने, सदर यशात त्यांचा देखील वाटा महत्वाचा ठरला आहे. पोलीसांची जास्तीत जास्त जनताभिमुख कामकाज करुन नागरिकांच्या अधिकाधिक तक्रारी सोडविण्यावर भर दयावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.