
NANDED TODAY:05,05,2021 नांदेड- सध्या देशात कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सध्या उद्भवत असलेल्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी नांदेड शहरातील समस्या व तिसऱ्या लाटेचा सामना जर करायचा असेल तर शहरात नव्याने 500 बेडचे जम्बो कोव्हिडं केअर सेंटर उभारण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत संबंधित विभागाला कळवणार असल्याचे सांगितले आहे.
सध्या नांदेड शहरात लसीची मोठ्या प्रमाणात कमतरता असून लस अभावी लसीकरण केंद्र देखील बंद पडले आहेत. तसेच अँटीजन्य कोरोना तपासणी किट नसल्यामुळे आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. त्यामुळे लॅबवर मोठ्या प्रमाणात रिपोर्टला विलंब लागत आहे. जवळपास तीन ते चार दिवस आरटीपीसीआर चा रिपोर्ट येण्यास लागत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा सिटी स्कोर वाढत असून संबंधित रुग्ण गंभीर होत चालला आहे. नांदेड शहरात दोनच लॅब असल्यामुळे, त्यांच्यावर देखील प्रचंड ताण येत आहे.
यामुळे नव्याने एक लॅब देखील उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी केली आहे. तसेच रुग्णांना आवश्यक असलेले रेमेडीसिविर हे इंजेक्शन देखील नांदेड मध्ये उपलब्ध होत नाही, अशा अनेक अडचणी आ. बालाजी कल्याणकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. यावर लवकरात लवकर तोडगा काढून नांदेडला मुबलक लस, रेमेडीसिविर तसेच अँटीजन्य किट उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती देखील केली आहे. आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे भाकित अनेक तज्ञ व्यक्त करीत आहेत.
याच पार्श्वभूमीवर नांदेड शहरात नव्याने 500 बेडचे जम्बो कोव्हिडं केअर सेंटर उभारण्याची गरज असल्याचे मत देखील आ. बालाजी कल्याणकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केले आहे. दोन दिवसापूर्वीच नांदेड जिल्ह्यासाठी राज्य शासनाने 52 ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आ. बालाजी कल्याणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांचे आभार देखील मांडले आहेत.