NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

नांदेड-मुंबई वंदे भारत कधीपासून धावणार?

Nanded-Mumbai Vande Bharat Express: महाराष्ट्रातील परभणी आणि नांदेड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. जालना ते मुंबई दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस आता नांदेडहून धावणार आहे. रेल्वेने मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आणखी दोन जिल्ह्यांतील प्रवाशांना वंदेभारतने प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. या विस्ताराला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली असून यामुळे नांदेड आणि परभणी येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात सध्या 11 वंदे भारत एक्सप्रेस एक्सप्रेस धावत आहेत. यात सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या गाड्यांचा समावेश आहे.

वंदे भारत ट्रेनचा नांदेडपर्यंत विस्तार
दरम्यान राज्यात वंदेभारत ट्रेन्सचा हळूहळू विस्तार केला जात असून आगामी काळात मुंबई-पुण्यासारख्या शहरांना आणखी नव्या वंदे भारत सेवांची जोड मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यानच्या वंदे भारत ट्रेनचा मार्ग नांदेडपर्यंत विस्तारण्याचा मोठा निर्णय रेल्वेने घेतला आहे. परंतु ही ट्रेन कधीपासून धावणार याची प्रवाशांना प्रतिक्षा आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही.
संभाजी नगरमधील प्रवाशांची नाराजी
रेल्वेने नुकताच मुंबई-जालना वंदे भारत ट्रेनचा मार्ग नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही सेमी-हायस्पीड ट्रेन आता नांदेडपर्यंत धावणार असल्याने नांदेड आणि परभणीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. पण यामुळे छत्रपती संभाजी नगरमधील प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथल्या प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक

नांदेड रेल्वे स्थानकातून ही गाडी पहाटे 5 वाजता सोडली जाईल आणि 5:40 वाजता परभणी रेल्वे स्थानकावर पोहोचेल. त्यानंतर 7:20 वाजता जालना, सकाळी 8:15 वाजता छत्रपती संभाजी नगर, आणि दुपारी 2:25 वाजता मुंबईत दाखल होईल. परतीच्या प्रवासात ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 1:10 वाजता रवाना होईल आणि रात्री 10:50 वाजता नांदेडला पोहोचेल. ही वंदे भारत ट्रेन परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा घेईल.
किती असेल तिकीट दर?
सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, एसी चेअर कारचे तिकीट अंदाजे 1,750 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट 3,300 रुपये असू शकते. ही माहिती अंतिम होईपर्यंत रेल्वेच्या अधिकृत सूचनेची वाट पाहावी लागेल