
समाजात नाती नात्यांपासून दूर जात असताना व स्वार्थीवृत्तीपुढे सगेसोयरे दूर लोटण्याच्या काळात कदम पाटील कोंढेकर परिवाराने पाहुण्यातील एका मुलीचे पालकत्व स्वीकारून तिला आपली मानसकन्या मानून तिचे उच्च शिक्षण स्वतः पूर्ण केले व तिचा विवाह लावून दिला.
NANDED TODAY:22,Feb,2021 नांदेड एस.टी. महामंडळातील निवृत्त कर्मचारी बाबुराव मारोतराव पाटील कदम कोंढेकर यांचे चिरंजीव अभिजीत उर्फ मुन्ना पाटील कदम यांनी वसमत तालुक्यातील कौठा येथील शेतकरी कुटुंबातील आपली मेहुणी सौ. विजयमाला व श्री बेगाजी पाटील खराटे यांची मुलगी तिलोत्तमा हिचे पालकत्व स्वीकारून व स्वतः आजपर्यंत नांदेड येथे आपल्या घरी ठेवून तिचे एम.ए., डी.एड., बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व नुकताच तिचा विवाह सौ. दापशेड ता.लोहा येथील (ह.मु. नांदेड) सौ. गंगासागर व श्री प्रभाकरराव कदम यांचे चिरंजीव प्रा. साईप्रसाद यांच्याशी मोठ्या थाटामाटात लावून दिला. आपण स्वीकारलेल्या पालकत्वाची संपूर्ण जबाबदारी मुन्ना पाटील कदम व संपूर्ण कदम पाटील कोंढेकर परिवाराने पार पाडली.
त्यांच्या मातोश्री कै. गिरजाबाई कदम कोंढेकर यांच्या नावे चालत असलेल्या “गिरजाई प्रतिष्ठान” अंतर्गत हा विवाह पार पडला. लहानपणापासून आईने समाजसेवेचे केलेले संस्कार ही चारही भावंडे विसरली नाहीत, एस.टी.महामंडळ कर्मचारी आनंदराव बाबुराव कदम, लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय येथे कार्यरत असलेले प्रा. अरविंद कदम, कदम कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. अनिल कदम व कंत्राटदार अभिजीत उर्फ मुन्ना पाटील कदम ही चारही भावंडे आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून आहेत.
“ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, प्रसिद्ध लेखक, दलित मित्र पुरस्कार प्राप्त कै. गंगारामजी पाटील कऱ्हाळे गिरगावकर या त्यांच्या आजोबांचे त्यागाचे व आई कै. गिरजाबाई कदम कोंढेकर यांचे समाजसेवेचे संस्कार आमच्यावर आहेत, म्हणून हे शक्य झाले”, असे मुन्ना कदम यावेळी बोलताना म्हणाले. पुढे ते म्हणाले, की “गिरजाई प्रतिष्ठान तर्फे या यापुढेही समाजसेवेचे उपक्रम चालत राहतील.”
बाबूरावजी कदम कोंढेकर यांच्या चारही स्नुषा सौ. रुक्मिणी, सौ. सुवर्णा , सौ.आशा व सौ. रेखा यांचा आपल्या कुटुंबाकडून होणाऱ्या समाजसेवेच्या कार्यात नेहमीच सहभाग राहिला आहे.
कदम पाटील कोंढेकर परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी समाजात एक आगळा-वेगळा पायंडा पाडून एक नवा आदर्श जनमानसा समोर ठेवला आहे.