कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल..!

कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल..!

Spread the love

NANDED TODAY:13,May,2021 कोणत्याही संसर्गाच्या लाटा येतच असतात. कोरोना संसर्गाच्या चार ते पाच लाटा येतील, असा अंदाज आहे. अमेरिकेतील मिशिगन आणि फ्रान्समध्येही संसर्गाची चौथी लाट आली आहे. त्यामुळे, तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि तीव्रता कशी कमी करता येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आपण निर्बंध घातले. यावेळी जर अनलॉक योग्य पद्धतीने केलं नाही‌ म्हणजेच लोकांनी मास्क, सॅनिटाईझर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब केला नाही. गतवर्षी जसा गलथानपणा केला तसाच आताही होऊ लागला तर तज्ज्ञांनी जाहीर केल्याप्रमाणे सप्टेंबरमध्ये तिसरी लाट १०० टक्के येणार हे निश्चित आहे.

ती न येऊ देणं आपल्याच हातात आहे. बेजबाबदारपणाने, निष्काळजीपणाने वागणे हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेलाच आमंत्रण देणे होय. परंतु तिसरी लाट आली आणि पसरु लागलीच तर तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल. एक म्हणजे जीव वाचवणं आणि दुसरं, रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती न येऊ देणं या आहेत. घरच्या-घरीच सौम्य रुग्णांवर उपचार तिसऱ्या लाटेत पहिलं ध्येय ठरलं पाहिजे. सप्टेंबरपर्यंत आपण १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण करू शकणार नाही. सर्वत्र ‘आज लस नाही’ चे बोर्ड लागत आहेत.

त्यामुळे, आपली प्राथमिकता ६० ते ९० वर्षं वयोगटातील ८० टक्के लोकांचं लसीकरण असली पाहिजे. दुसरा डोस देण्याची वेळ आली तरीही लशीच्या अनाकलनीय तुटवड्यामुळे विस्मयकारक परिस्थिती निर्माण होऊ लागली म्हणून आधी ज्या ज्येष्ठांनी पहिली लस घेतली, त्यांनाच आधी दुसरी लस देण्याचा निर्णय घ्यावा लागला. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना देण्यात येणारी पहिली लस बंद करावी लागली. मागणी वाढली आणि पुरवठा कमी होऊन तुटवड्यात वाढ होऊ लागली. हा नियोजनातील गलथानपणाही म्हणता येईल. 

यावर्षी मार्चच्या सुरुवातीला भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी घोषित केलं की, भारतातली कोरोना साथ संपत आली आहे. एवढंच नव्हे तर हर्षवर्धन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्याचं उत्तम उदाहरण असल्याचंही म्हटलं होतं. जानेवारीपासून भारतानं ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’अंतर्गत विविध देशांना लशी पुरवल्या गेल्या. हा आशावाद नि आत्मविश्वास भारतात कोरोनाग्रस्तांची कमी होत जाणाऱ्या आकडेवारीच्या आधारावर बेतलेला होता.

गेल्यावर्षी सप्टेंबरच्या मध्यात रुग्णसंख्या सर्वोच्च शिखरावर असताना, ९३ हजारहून अधिक रुग्ण दरदिवशी आढळत होते. त्यानंतर यंदा फेब्रुवारीच्या मध्यात भारतात दरदिवशी सरासरी ११ हजार रुग्ण आढळत होते. कोरोनानं मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी होऊन, दिवसाला १०० च्या खाली आली होती.‌ गेल्या वर्षापासून कोरोनाशी लढा दिला जातोय. राजकीय नेते, धोरणकर्ते आणि माध्यमातील काही लोक असं मानू लागले की, भारत कोरोनाच्या संकटातून बाहेर पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर ‘व्हॅक्सिन गुरू’ उपाधी देऊनही सगळे मोकळे झाले होते. या चुका आता होऊ नयेत. 


 सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत जेवढ्या लोकाचं लसीकरण होईल. त्यावरून, तिसऱ्या लाटेची तीव्रता किती कमी होईल हे समजू शकेल. लशीमुळे आजाराची तीव्रता कमी होऊन, मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. सामुदायिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी ८० टक्के लोकांचं लसीकरण करावं लागेल. घरोघर जाऊन लसीकरण करावे लागेल. तेवढ्या लसी उपलब्ध झाल्या पाहिजेत. पण हे अशक्य आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. रुग्णांना ऑक्सिजन, व्हॅन्टिलेटरची गरज भासली नाही. तर, आपण तिसरी लाट थोपवू शकलो असं म्हणता येईल.

लसीकरण पूर्ण होण्यासाठी वर्ष लागेल. १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष लागेल. सद्यस्थितीत लशींची मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. सरकारने घोषणा करून काहीच उपयोगाचे नाही. सद्याची वस्तूस्थिती पहायला हवी. राज्यात तीव्र लसटंचाई निर्माण झाली आहे. राज्यात सुमारे एकवीस लाख लोक दुसऱ्या लशींसाठी प्रतिक्षेत असल्याची माहिती आहे. राज्यात २४ तास लसीकरणाची अतिजलदगतीने मोहीम हाती घेतली तरी लसीकरण पूर्ण होण्यासाठी या वर्षाचा शेवट येईल, असा अंदाज आहे.

 
 कोरोनाचे सतत उत्परिवर्तन होत राहिले तर कोव्हिडविरोधी लस दरवर्षी घ्यावी लागेल. लस घेतल्यानंतर संसर्गापासून किती सुरक्षा मिळते, यावर मतमतांतरं आहेत. काही डॉक्टर म्हणतात, विषाणू रोगप्रतिकारशक्तीला चकवतो. लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही संसर्ग होतो. यात आजारचं स्वरूप गंभीर देखील होतं. त्यामुळे, लशीचा तिसरा-चौथा डोस लागणार आहे. आपण स्वत:ची काळजी घेतली नाही. मास्क घातला नाही तर त्रास होणारच आहे. देशात उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्य किंवा केंद्रावर बोट दाखवण्यात अर्थ नाही. हा विषाणू फक्त दीड वर्ष जुना आहे. जूना असला तरी तो नवा होऊ शकतो. आरोग्य सुविधांवर राज्यात सकल उत्पन्नाचा फक्त दीड टक्का खर्च होतो.

आरोग्यावर चार टक्के खर्च झाला पाहिजे. जगभरातील देश आरोग्य सुविधांवर चार टक्के खर्च करतात. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. ऑक्सिजन, औषध, सर्वांवर ताण पडत आहे. आरोग्य सुविधा एका रात्रीत तयार होऊ शकत नाहीत. यासाठी मोठी रणनिती आखावी लागेल. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू होतोय. पूर्ण कुटुंबच्या कुटुंब कोरोनाग्रस्त होत आहेत. अख्खे कुटुंबच संपत आहे. काहीजण तर कोरोनाने मरण्यापूर्वीच आत्महत्या करीत आहेत. स्मशानभूमीत अग्निसंस्काराच्या रांगेत प्रेतांची मोठी संख्या असणं किंवा अस्थी विसर्जनाऐवजी नदीतच प्रेतांची विल्हेवाट लावणं ही अत्यंत भयावह बाब आहे.

दवाखान्यात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत आणि त्यामुळे एकप्रकारची दहशत निर्माण झाली आहे. या परिस्थितीत परदेशात राहणाऱ्या भारतीयांना किंवा एकमेकांपासून दूर राहणाऱ्यांना एका वेगळ्या आणि विचित्र मानसिकतेचा अनुभव येतो आहे. अशा संकटकाळात तुमचे नातेवाईक तुमच्या मदतीला येऊ शकणार नाहीत किंवा तुम्हाला त्यांना मदत करता येणार नाही. अनेक रुग्णालये कोव्हिड केंद्र म्हणून रुपांतरीत झाले आहेत. भारतातील जवळपास सर्वच कोव्हिड रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी अजूनही आहे. अनेक ठिकाणी औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असल्याचं दिसून येतं आहे. ही परिस्थिती तिसऱ्या लाटेआधी सुधारली पाहिजे.  यंदा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधील निवडणुका जाहीर केल्या. १८ कोटी ६० लाख लोक मतदार असलेल्या या राज्यांमधील ८२४ जागांची ही निवडणूक झाली. महिनाभर मतदानाचे टप्पे होते. पश्चिम बंगालमध्ये तर सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान झाले. निवडणुकीचा प्रचारही मोठ्या प्रमाणात झाला. सुरक्षेचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंग यांचा पार फज्जा उडाला. मार्च महिन्याच्या मध्यात भारतीय क्रिकेट बोर्डानं भारत विरुद्ध इंग्लंड सामना पाहण्यासाठी एक लाख ३० हजार क्रिकेट रसिकांना गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानात उपस्थित राहण्यास परवानगी दिली होती.

यातील बरेच क्रिकेट रसिकांनी मास्कही परिधान करून आलेनव्हते. एकीकडे असा गोंधळ आणि भीतीचं वातावरण असतानाच, दुसरीकडे जगातील सर्वांत श्रीमंत मानली जाणारी क्रिकेट स्पर्धा अर्थात इंडियन प्रीमियर लीग बंद मैदानांमध्ये कुठल्याही क्रिकेट रसिकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना दररोज सुरू होती. तरीही अनेक खेळाडू बाधित झाले. मग ही स्पर्धा बंदच करावी लागली. दुसरीकडे, ज्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या तिथं हजारो लोक आपापल्या नेत्यांच्या सभांमध्ये उपस्थित राहत होते तसे कुंभमेळ्यातही मोठ्या प्रमाणावर साधूसंतासह धार्मिक लोक सहभागी झाले होते. या घडामोडींच्या अवघ्या महिन्याभरात भारतात दुसऱ्या लाटेनं धडका देण्यास सुरुवात केली. भारतातील अनेक शहरात अचानक रुग्णसंख्या वेगानं वाढू लागली. पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची अनेक शहरांवर वेळ आली. एप्रिलच्या मध्यापर्यंत तर भारतात दिवसाला सरासरी एक लाखांहून अधिक रुग्ण सापडू लागले. अशी परिस्थिती आपण हाताने ओढवून घेतली. निवडणूका, क्रिकेटचे सामने, धर्ममेळे यांना इतके महत्त्व अशा महामारीत देणे योग्य आहे काय?

 भारत आजच्या घडीला आरोग्य आणीबाणीच्या कचाट्यात अडकलाय. सोशल मीडियावर कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्काराचे व्हीडिओमागून व्हीडिओ शेअर केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांच्या पार्थिवांच्या स्मशानाबाहेर रांगा लागल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी एकाच बेडवर दोन दोन रुग्णांना ठेवावं लागण्याची वेळ आली. रुग्णालयाच्या कॉरिडोअर आणि लॉबीमध्येही रुग्णांवर उपचार केले जाऊ लागले आहेत. बेड्स, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधं आणि चाचण्या यांसाठी मदतीच्या याचनाही सोशल मीडियाद्वारे केल्या जात आहेत. औषधं काळ्या बाजारात विकली जात आहेत. चाचणीचे अहवाल येण्यासाठी बरेच दिवस लागत आहेत.

भारतातल्या लसीकरण मोहिमेतही अडथळे येऊ लागलेत. देशभरात एक कोटीहून अधिक डोसेस पुरवल्यानंतरही अनके ठिकाणी लशींचा तुटवडा जाणवू लागलाय. भारतातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं म्हटलं की, आर्थिक कुवत कमी पडत असल्यानं जूनपर्यंत लशींचा पुरवठा वाढवू शकत नाही. भारतानं ‘ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेका’ लशीची निर्यात काही काळासाठी थांबवली. कारण देशांतर्गत लशीला आधी प्राधान्य देण्याचं भारतानं ठरवलं होतं. शिवाय, परदेशी लशीची आयात करण्याचाही निर्णय सरकारनं घेतला. किंबहुना, आता ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जगभरातून आयात करण्यास प्रारंभ झाला आहे. अनेक देश भारताच्या भयंकर परिस्थितीकडे पाहून मदत देऊ लागले आहेत. 


भारतातील युवा वर्ग, भारतातील रोगप्रतिकारक शक्ती, अधिकाधिक ग्रामीण भाग अशा गोष्टी पाहून भारतानं कोरोनावर मात केल्याच जाहीर केलं. मात्र, हा अतातायीपणा होता. स्तंभलेखक मिहीर शर्मा म्हणतात की देशातील अधिकाऱ्यांचा अहंकार, अति-राष्ट्रवाद, प्रशासनातील अक्षमता यांमुळे हे संकट पुन्हा वाढलं आहे. लोकांनी सुरक्षेच्या नियमांकडे केलेलं दुर्लक्ष, लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणं, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी, तसंच सरकारकडून येणाऱ्या संदेशांचा गोंधळ यांमुळे दुसऱ्या लाटेला जोर मिळाला. कोरोनाची साथ थोडी कमी होत गेली, तसं लोकांनी लस घेण्याचंही कमी केलं. याकाळात लसीकरण मोहीम मंदावली होती.

खरं तर गतवर्षी जुलै अखेरीपर्यंत २५ कोटी लोकांना लस देण्याचं लक्ष्य होतं. परंतु ते काही साध्य होऊ शकलं नाही. भारतानं कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असली, तरी लसीकरण मोहिमेला वेग दिलाच पाहिजे होता. मात्र, याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. इथं एकप्रकारच्या विजयाचं वातावरण होतं. काहीजणांना वाटलं की आपण जबरदस्त रोगप्रतिकारक शक्ती कमावलीय. कारण आपल्याला पहिल्या लाटेत काहीही झालेलं नाही. आपण मोठ्या संख्येने एकत्रितपणे रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर कोरोनाशी लढा दिला. आम्ही ही साखळी तोडली, हा गैरसमज होता. या समुहातील प्रत्येकाला पुन्हा कामावर जायचं होतं. कोरोना अजून संपला नाही याबाबत काहीजण बोलत होते, मात्र त्यांच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले गेले. स्थानिक प्रशासनही गाफील राहिले. भारतातील कोरोनाची दुसरी लाट टाळता आली नसती, पण कमीतकमी तिचं उपद्रव-मूल्य कमी करता आलं असतं. याच काळात इतर देशांप्रमाणेच भारतानेही जानेवारीपासूनच विषाणूंच्या नव्या रुपांच्या, प्रकारांच्या तपासणीसाठी जनुकीय संरचेनाचा शोध घ्यायला हवा होता. 


काही विषाणू संक्रामक हे कोरोनाग्रस्तांच्या वाढीला कारणीभूत असू शकतात. फेब्रुवारीत महाराष्ट्रातील काही रुग्णांमुळे आपल्याला विषाणूंच्या नव्या नव्या संरचनात्मक बदलाबाबत समजलं. मात्र, प्रशासानं तेव्हाही नाकारलं होतं. हा आपल्याकडील दुसऱ्या लाटेचा टर्निंग पॉईंट ठरला. भारतानं अतातायीपणा करत विजयाची घोषणा करायला नको होती. भविष्यातल्या आरोग्य संकटावेळी लोकांनीही लहान-सहान लॉकडाऊनसाठी अनुकूल राहायला हवं होतं. परंतु इथे टाळेबंदी विरोधात आंदोलने होऊ लागली. टाळेबंदी कुणालाही मान्य नव्हती. भारत अद्यापही लसीकरण मोहिमेत खूप मागे आहे. अनेक साथरोग तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की अजून कोव्हिडच्या बऱ्याच लाटा येऊ शकतात. भारताचा लसीकरणाचा दरही मंद आहे त्यामुळे भारतीय लोक कोरोना विषाणूशी टक्कर देऊ शकणाऱ्या सामुदायिक रोगप्रतिकारक शक्तीपासूनही कोसो दूर आहे.


आपण लाॅकडाऊन करुन लोकांचं आयुष्य ठप्प करू शकत नाही, हे खरं असलं तरी लोकांनी गर्दीच्या शहरात अंतर पाळणंही शक्य नसलं तरी किमान सगळ्यांनी नीटपणे मास्क तरी वापरायला हवे. हे आपल्या हातात आहे आणि तो मास्क नीट परिधान केला पाहिजे. ही काही मोठी गोष्ट नाही. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत १५ ते ४० वयोगटातील व्यक्तींमध्ये संसर्ग जास्त दिसून येत नव्हता. मधुमेह, उच्च रक्तदाबाने आजारी व्यक्ती, फुफ्फुसं निकामी झालेले किंवा फुफ्फुसांचे आजार असलेल्यांमध्ये कोरोनासंसर्ग जास्त दिसून आला होता. यावेळी कोरोनासह इतर आजार असणाऱ्यांबरोबरच इतर कोणतेही आजार नसलेल्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत आहे.

ही चिंतेची बाब आहे. आपण शारिरिकदृष्ट्या मजबूत आणि तंदुरुस्त आहोत, आपल्याला काही होणार नाही या भ्रमात कुणी राहू नये. डायलेसिसवर असलेल्या रुग्णांमध्ये संसर्ग कमी दिसून येत असेल पण ज्यांना कोणताही आजार नाही, जे सुदृढ आहेत, अशांमध्ये कोरोनासंसर्गाची शक्यता जास्त वाढली आहे. यावर्षी १५ ते ३० वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लक्षणं दिसून आल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी लोक रुग्णालयात येत आहेत. दुखणं अंगावर काढणं हे मृत्यूला आमंत्रण देणेच होय. त्यामुळे आजाराचा पहिला दिवस ओळखणं महत्त्वाचं आहे. चाचणी ही अत्यावश्यक बाब आहे. जर एखादी व्यक्ती बाधित झाल्याचे समजले तर त्या व्यक्तीने घाबरून न जाता ताबडतोब विलिनीकरणात राहून उपचार घेतले पाहिजेत.

आजार झाल्यानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवसाच्या आधी रुग्णालयात दाखल होणं गरजेचं आहे. दुखणं अंगावर काढणं चुकीचच आहे, ही बाब दुर्लक्षिता कामा नये. पण यावेळी असं लक्षात आलं आहे की, सुशिक्षित युवा वर्ग बराचकाळ घरी राहात आहे. याचं कारण त्यापैकी काही परस्पर रक्ताच्या चाचण्या करत आहेत. काही जण चाचणीआधीच सीटी स्कॅन करून घेत आहेत, तर घरीच आरटीपीसीआर टेस्ट करून घेतात. खासगी लॅबमध्ये रिपोर्ट येण्यास तीन दिवस लागतात. हे तीन दिवस हानिकारक ठरत आहेत. रिपोर्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत ह्या उपचारांकडे दुर्लक्ष केले जाते. अशांना त्यांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग असल्याचं दिसून आलं आहे. उलट पाॅझिटीव्ह आणि स्कोअर पाचपर्यंत असलेले तरुण बिनधास्त बाहेर फिरत आहेत.

या सुशिक्षित लोकांमधील गैरसमज दूर करणं, शक्य होत नाही. जे सर्वात महत्त्वाचं आहे. लोकांना गैरसमज आहे की मला कोरोना होणार नाही. लोक उदाहरण देतात, इतर ठिकाणी गर्दी आहे. तिथे कोरोना होत नाही. कोरोना होणार नाही याची खात्री कोणीही दिलेली नाही. त्यामुळे मलाही कोरोना होऊ शकतो, असा समज लोकांनी ठेवला पाहिजे. मी कितीही सुदृढ असलो तरी मला कोरोना संसर्ग होऊ शकतो. याचं कारण, हा विषाणू वय पाहत नाही. नवजात मुलांपासून ते १०० वर्षाचे वृद्ध सर्वांना हा आजार होतो, ह्यात आता कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. 
कोरोना महामारीत तरुण वर्ग बेफिकीरपणे वागत असल्याचे दिसते. पार्टी, विकेंडला बाहेर जाणं, काम नसतानाही बाहेर फिरणं यामुळे युवा पिढीला संसर्ग जास्त होतो आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत कोरोनाने महाभयंकर रूप धारण केलं आहे. कोरोनाचा हा विषाणू अखंड मानवी जीविताला चिंतेत टाकणारा विषय आहे. हा विषाणू सर्दी – खोकल्यातूनच नव्हे तर संपर्कक्षेत्रातील हवेतूनही पसरत आहे. पहिल्या लाटेत कोरोनासंसर्ग खोकल्यातून, कोणत्याही पृष्ठभागाच्या संपर्कात आल्याने होतो असं गृहीत धरण्यात येत होतं. पण, यावेळी नक्की लक्षात आलं आहे की, कोरोनासंसर्ग हवेतून पसरत आहे. म्हणूनच मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे.

हा मास्क कापडी नसावा. तिहेरी थरांचा किंवा सर्जिकल मास्क वापरावा. मास्क वापरल्यानंतर थोडंसं अस्वस्थ वाटलं, तर मास्क चांगला आहे असं समजावं. लक्षात घ्या की, जपानमध्ये दोन लोक एकत्र आले तर गर्दी मानली जाते. पण आपल्याकडे पाच लोक भेटल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आत दोन लोकांची संख्या ही गर्दी समजावी. यासाठी फिझिकल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवताना एकटंच जेवण केलं पाहिजे. बोलताना मास्क खाली करून बोलायला नको. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत कोरोनाबाधित झाल्यानंतर हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, पायात रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी किंवा गँगरीन झाल्याने येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती.

पण दुसऱ्या लाटेत डोळे लाल होणं, तोंडाला चव नसणं, वास न येणं. त्यासोबत सर्दी, खोकला, ताप, थकवा आणि सांधेदुखी /संधिवात अशी लक्षणं पहायला मिळाली आहेत. विषाणूमध्ये बदल होत असतात. कोरोना विषाणूला तर उत्परिवर्तित होण्यासाठी चारशे दिवस मिळाले. आपण लोकांमध्ये गर्दीत मिसळलो. सतत मिसळत गेलो. त्यामुळे विषाणू उत्परिवर्तित होत गेला. या विषाणूशी लढण्यासाठी आपण लसीकरण सुरू केलं आहेच. पण त्याबरोबरच लवकर तपासणी करुन घेणं, बाधीत झाल्याचे लक्षात आल्याबरोबर औषधोपचार घेणं, सौम्य लक्षणे असतील तर लगेच विलिनीकरण करुन घेऊन संक्रमण होऊ न देणं, त्रिसूत्रीचे कठोर पालन करणं याही गोष्टी केल्या पाहिजेत.

खासकरून तरुण पिढीसाठी आवश्यक आहे. लोकांमध्ये एकदा रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली की समुहरुपाने विषाणूशी लढण्याची समुहशक्ती तयार होईल. युवापिढीला सांगितलं पाहिजे की, तुम्ही कुटुंबाचे आणि देशाचे आधारस्तंभ आहात. त्यामुळे काळजी घ्या. तुम्हाला पिढी पुढे न्यायची आहे. मागच्या पिढीलाही सांभाळायचं आहे. त्यामुळे सशक्त रहाणं गरजेचं आहे. आपणा तरुणांकडे असलेली, कमावलेली अनेक वर्षाची ताकद कोरोनाला हरवू शकत नाही. मास्क, स्वच्छता आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचं पालन कराल तर तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुमचं कुटुंबही सुरक्षित राहील. (क्रमशः)

Total Page Visits: 1143 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top