
NANDED TODAY:25,Dec,2021 नांदेड व लातूर ही मराठवाड्यातील दोन प्रमुख शहरे थेट रेल्वे मार्गाने जोडण्याची गरज असून, राज्य शासनाने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनी आज विधीमंडळात मांडली.

नियोजन विभागाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत बोलताना त्यांनी हा विषय उपस्थित केला. नांदेड व लातूर ही शहरे थेट रेल्वे मार्गाने जोडण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची संकल्पना उचलून धरताना

आ. हंबर्डे म्हणाले की, ३६ लाख लोकसंख्येचे नांदेड आणि २६ लाख लोकसंख्येच्या लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दळणवळण होते. ही दोन्ही शहरे थेट रेल्वे मार्गाने जोडण्याची आवश्यकता आहे. नांदेडहून
लातूरला रेल्वेने जाण्यासाठी पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी असा प्रवास करावा लागतो. हे अंतर २१२ किलोमीटर आहे व त्यासाठी साडेसहा तास लागतात. रस्ते मार्गे प्रवास केल्यास तीन तास लागतात. सरळ रेषेत नांदेड

व लातूरमधील अंतर केवळ १०० किलोमीटर असून, त्यानुसार नवीन रेल्वे मार्ग उभारल्यास नांदेड व पुण्यातील रेल्वेचे अंतर ११० किलोमीटरने कमी होईल. इंधनाची बचत होऊ शकेल. या रेल्वे मार्गामुळे सोनखेड, लोहा,
माळेगाव, अहमदपूर या शहरांचा व्यापार वाढीस लागेल. उपलब्ध माहितीनुसार, २०१८ मध्ये नांदेड व लातूर शहर रेल्वेने जोडण्याचा विचार झाला होता. त्याचे सर्वेक्षण देखील झाले होते. परंतु, हा प्रकल्प आर्थिक

दृष्ट्या व्यवहार्य नाही असे सांगून तो बंद करण्यात आला. वास्तविकतः हा रेल्वे मार्ग जनतेच्या सोयीचा असल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकल्पाची मागणी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने ही मागणी मान्य करून सदरहू प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असे आ. मोहन हंबर्डे यांनी यावेळी सांगितले.