
NANDED TODAY:26,Sep,2021 नांदेड, प्रतिनिधी – वडार समाजाने वंचित आणि बहुजन म्हणुनच राजकिय भुमिका पार पाडायला हवी असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद यांनी केले
ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड येथे संपन्न झालेल्या वडार समाज संवाद बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना फारुक अहमद म्हणाले की, केवळ मतापुरते या समाजाला प्रस्थापित राजकीय पक्ष जवळ करतात.
या समाजाच्या विकासाचा मुद्दा आला की प्रस्थापित राजकीय पक्ष या समाजाकडे दुर्लक्ष करतात. मतदाना पुरते वडार समाज बांधव हे हिंदू म्हणून जवळ केले जातात. मात्र या समाजावर अन्याय झाला की,

या समाजाच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला की हा समाज वडार म्हणून समाजाला बाजुला पाडले जाते. त्यामुळे आगामी काळात या समाजाने आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आव्हान फारूक अहमद यांनी केले.
नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटन बांधणीला जोमाने सुरुवात झाली असून यादरम्यान अनेक वंचित जात समूहांना वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न होत आहेत.
अशातच आज नांदेड शहर व जिल्ह्यातील अनेक वडार समाजाच्या कार्यकर्त्यांसह समाजबांधवांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वडार समाजाच्या अनेक मागण्या व समस्या या संदर्भात चर्चा करण्यात आली.
प्रामुख्याने वडार समाजासमोरील आव्हाने यावर चर्चा झाली. समाजात अनेक उच्चशिक्षित तरुण असून देखील त्यांना योग्य न्याय मिळत नाही. अनेकांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.
या समाजात पोटाची खळगी भरण्याचा प्रश्नच न सुटल्यामुळे हा समाज प्रगती पासून कोसो दूर राहिला आहे. डोक्यावर छत नाही. काम केल्याशिवाय चूल पेटत नाही. अशी अवस्था असणारे या समाजात शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण आहे.

पारंपारिक संस्कृतीला जखडून असलेल्या या समाजात अनेक चुकुच्या चालीरीती प्रचलित आहेत. त्यामुळे अज्ञान व अंधश्रद्धा याचे प्रमाणही या समाजात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षाच्या नंतरही या समाजाला राजकीय नेतृत्व पाहिजे
त्या प्रमाणात मिळाले नाही. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीच्या वाटा खुंटल्याचे चित्र आहे. राज्यातील प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी केवळ प्रलोभने देऊन या समाजाचा मता पुरता उपयोग केला आहे.
समाजाच्या जीवन-मरणाच्या मूलभूत समस्या कायम आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने या समाजाच्या व्यथा जाणून घ्याव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्यावर जमेल ते काम करावे या उद्दात हेतूने वडार समाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नांदेड जिल्हा महासचिव प्रा. साहेबराव बेळे यांच्या पुढाकाराने व नांदेड महानगरच्या वतीने ‘वडार समाज संवाद बैठकीचे’ आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य प्रवक्ते फारूक अहमद हे होते
तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे विभागीय सदस्य डाॅ संघरत्न कु-हे, जिल्हा महासचिव श्याम कांबळे तर संयोजक म्हणुन दक्षिणचे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, उत्तर महानगराचे अध्यक्ष आयुब खान पठाण, देगलूर तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, महानगर महासचिव अमृत नरंगलकर,
महानगर नांदेड उत्तर व्यंकटेश पवार,संभाजी देवकर , अर्जुन मेटकर, हर्ष धोत्रे, प्रा.व्यंकटी मेटकर, व्यंकटेश पाळेकर, विमलताई पवार, मंगल ताई ओरसोडे, चंदू मेटकर,शिवाजी मेटकर,ऍड. पी.जी.आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. साहेबराव बेळे यांनी केले. सूत्रसंचालन अमृत नरंगलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयुब खान पठाण यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील अनेक प्रमुख वडार समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.