
NANDED TODAY: 27,Sep,2021 अविनाश पठाडे , श्रीक्षेत्र माहूर -केंद्रीय मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजने अंतर्गत जि.प.च्या माध्यमांतून इयत्ता पहीली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा या हेतूने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली.
त्यानुसार माहूर तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या वाई बाजार येथील जि.प.च्या के.प्रा.शाळेला दि.१७ जूलै रोजी ७ क्विं.मूगदाळ,१७ क्विं.७६ कि.तांदुळ व ९ क्विं. ५ कि.चना हा धान्य पुरवठा केला.

ते धान्य दर्जाहीन असल्याचे लक्षात आल्याने मुख्याध्यापक एन.बी.राठोड यांनी त्याचा उपयोग केला नाही.विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अपाय करणारा धान्य पुरवठा झाल्याचे वास्तव जाणून काही पालकांनी तक्रारीही केल्या,
मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी न घेता जि.प.च्या शिक्षण विभागाने (प्राथमिक ) सत्यतेकडे कानाडोळा करून केवळ तपासणी पथक पाठविण्याचाच खेळ चालविला असल्याचा आरोप करून धान्य पुरवठा
करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून पाठराखण करणाऱ्या सर्व संबंधीतांववर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करा अशी मागणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दि.२४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.
वाई बाजार येथील जि.प.च्या के.प्रा.शाळेत आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांची संख्या भरमसाठ असून त्यांच्यासह सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटीव्ह कंझ्युमर्स फेडरेशन मर्यादित

मुंबई द्वारे अज्ञात कंत्राटदार धान्य पुरवठा करीत असल्याचा उल्लेख करून अन्न व औषध प्रशासनाने प्रत्यक्षस्थळी जावून नमुने तपासल्यास राज्यातला सर्वात मोठा धान्य घोटाळा उघडकीस येण्याची दाट शक्यता
प्रशांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या तक्रारीत वर्तविली आहे. तक्रारीच्या प्रती अन्न पुरवठा मंत्री,आरोग्य मंत्री,जिल्हाधिकारी, खासदार/आमदारासह सर्वसंबंधीतांना पाठवून त्यांनी उचित कार्यवाहीची मागणी केली आहे.
चौकट…
धान्याच्या विवरण स्लिपवर कंपनीचा ट्रेडमार्क नाही,नंबर नाही व नावाचा उल्लेख सुद्धा नाही. धान्यात मोठया प्रमाणात दगड,काडी/कचरा व डस्ट असल्याने महाराष्ट्राने केरळच्या धर्तीवर धान्य खरेदी करण्याची मागणी
केरळ,कर्नाटकसह अनेक राज्यांना अव्वल नंबरची तूर डाळ पाठविण्याची व अनेक देशांत चना निर्यात करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे उद्योजक तथा योगेश्वर अॅग्रो इंडस्ट्रीजचे संचालक अतिष गेंट्लवार यांनी
पत्रकारांच्या माध्यमांतून केली आहे.प्रभारी गट शिक्षणाधिकारी व्यंकटेश पाटील यांची भ्रमणध्वनीवरून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला.मात्र ते प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत नव्ह्ते.