NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

घटना दुर्दैवी; रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ वाढवावे – खा. चिखलीकर

NANDED TODAY:2,अक्टूबर,2023 नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने मोठ्या उद्देशाने विष्णुपुरी येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या घटनेची वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत चौकशी होईलही, परंतु या ठिकाणी सहा जिल्ह्यातून दररोज दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांची संख्या पाहता येथे पुरेसा औषधी साठा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सक्षम टिमसह दर्जा आणि सुविधांची वाढ होणे आवश्यक आहे.

भाजपाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून तज्ज्ञ डॉक्टरांची टिम पाठविली आहे.
अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी असे सांगितले की, या रुग्णालयात दररोज 5 ते 6 रुग्णांचे मृत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतात. गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होतांना अगोदरच अत्यावस्थ असतात. त्यामुळे त्यांच्या आजारावरील धोका वाढलेला असतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या उपलब्ध मनुष्यबळाद्वारे जास्तीत जास्त चांगले उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. मागील 4 ते 5 दिवसांपासून सलग सुट्या असल्यामुळे नांदेड आणि आसपासच्या ठिकाणचे डॉक्टर बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये अतिगंभीर रुग्णांना दाखल होता आले नाही. मागील 3 दिवसात जे जास्त संख्येने मृत्यू झाले, त्यांच्या आजाराची कारणे वेगवेगळी आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अथवा औषधीच्या कमतरतेमुळे कोणताही मृत्यू झालेला नाही, असे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी खा. चिखलीकर यांना सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामधील सुविधा, औषधीसाठा दर्जा आणि तज्ञ डॉक्टरांच्या मनुष्यबळांची संख्या वाढविली पाहिली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली असून मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडेही हा विषय मांडणार असल्याचे खा. चिखलीकर यांनी सांगितले.