NANDED TODAY: 28,FEBRUARY, 2024
नांदेड- मागील तीन वर्षांपासून येथील विमानतळ बंद होते. सुरु असलेल्या एअर इंडिया आणि ट्रू जेट या कंपन्यांची सेवा बंद झाल्यानंतर नागरी उड्डयन विभागाने येथील विमानतळाचा परवानाही रद्द केला होता. पण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून दि. 27 फेब्रुवारीपासून येथील विमानतळ परवान्याचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.
अर्थात परवाना पुन्हा बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे आता येथून विमान उडण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. नागरी विमान उड्डयन विभागाच्या संचालकांनी मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात टेलिफॅक्स करुन उपरोक्त माहिती दिली आहे. 2008 मध्ये नांदेड येथील विमानतळ अद्ययावत होवून येथून विमानसेवा सुरु झाली होती.
परंतु अधुनमधून ही सेवा खंडितही होत होती. दरम्यान, त्यावेळी केंद्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेल्या एअर इंडिया या कंपनीने दिल्ली-नांदेड-मुंबई अशी सेवा सुरु केली होती. तर हैदराबादच्या ट्रू जेट या कंपनीने हैदराबाद-नांदेड-मुंबई अशी सेवा सुरु केली होती.
परंतू 2021 मध्ये ही सेवा बंद पडली. तत्पूर्वी कोरोनामुळे सेवा बंदच होती. विमानसेवा बंद झाल्याने नांदेडकरांची तर मोठी गैरसोय होतच होती. परंतु देशविदेशातील शिख भाविकांना नांदेड येथे सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा येथे मथ्था टेकण्यासाठी येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुढाकार घेत विमानसेवा पूर्ववत सुरु व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. चिखलीकर यांच्या मागणीची दखल घेत अधिवेशनात सकारात्मक निवेदनही केले होते. त्यानुसार नागरी उड्डयन विभागाने याबाबतीत आवश्यक सोपस्कार पूर्ण करुन नांंदेड विमानतळाचा निलंबित रद्द झालेला परवाना पूर्ववत बहाल केला आहे. त्यामुळे आता विमानसेवा सुरु होण्याचा मार्ग प्रशस्त झाला असून लवकरच येथून दिल्ली व मुंबई येथे विमानसेवा सुरु होईल, असा विश्वास खा. चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे व तिरुपती येथेही सेवा सुरु व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री खा. चिखलीकर म्हणाले.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!