NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचा लातूरमधील तक्रारदारांशी ‘संवाद’

नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे.

परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक हे प्रत्येक महिन्यास जिल्हा मुख्यालयांना भेटी देत असतात. यादरम्यान, त्या त्या जिल्ह्यातील तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी समजावून घेऊन, त्या तत्परतेने सोडवण्याचा पोलीस उप महानिरीक्षक यांचा प्रयत्न आहे.

दिनांक 12 ऑगस्ट रोजी, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी, पोलीस अधीक्षक, लातूर कार्यालयात जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर, दुपारी 03.30 ते 06.30 या वेळेत जिल्ह्यातील तक्रारदारांशी ‘संवाद’ साधला. यादरम्यान, एकूण (45) तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज पोलीस उप महानिरीक्षक यांना सोपविले. यात, मालमत्ता विषयक वाद, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय, इत्यादी तक्रारींचा समावेश आहे.

सदर दिवशी, प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन, त्यांच्या शिघ्र सोडवणुकीसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या शिघ्र सोडवणुकीसाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच ‘संवेदना’ ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. आज रोजी ‘जनसंवाद’ उपक्रमादरम्यान, प्राप्त झालेले सर्व अर्ज ‘संवेदना’ पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार असून, प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेण्यात येणार आहे.

याप्रसंगी, पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व शहरातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे हजर होते.

लातूरात मटका व जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाडी

(27) आरोपींविरुद्ध कारवाई,

(17) लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्हयात रवाना केले होते.सदर पथकाने, दिनांक 11.08.2026 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरुपती हॉस्पीटलकडे जाणारे रोडवर राजे बार ॲन्ड रेस्टारंट समोर टीन शेडमध्ये मटका बुक्कीवर कारवाई करत, 12,610/-रुपयांची रोकड व 19,000/- हजार रुपयांचे (3) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (6) आरोपीतांना ताब्यात घेवून, त् यांचेविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुरनं 396/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोह निजामोद्दीन शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.त्याचप्रमाणे, पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीत एम आय टी कॉलेज ते नवीन रेणापूर नाका येथे योगेश बनसोडे यांचे जागेतील पत्र्याचे शेडमध्ये कल्याण नावाच्या मटका बुक्कीवर कारवाई करत, 19,350/-रुपयांची रोकड व 42 हजार रुपयांचे (5) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (9) आरोपीतांना ताब्यात घेवून, त् यांचेविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाणे येथे गुरनं 577/2026 कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील पोह सुनिल हराळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.त्यांनतर, पथकाने अहमदपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनसोडे यांच्या शेतातील टीन शेडच्या बाजूस जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत, 37,320/-रुपयांची रोकड, (12) मोबाईल, (2) चारचाकी व (5) मोटार सायकली असा एकूण 16,91,720/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण (12) इसमांना ताब्यात घेवून, त् यांचेविरुध्द अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुरनं 540/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये नोंदवून, त्याचा तपास अहमदपुर पोलीस ठाण्यातील पोउपनि श्रीमंगल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.उपरोक्त तिन्ही कारवायांत, एकूण (27) आरोपींकडून 69,280/- रुपयांची रोकड, (20) मोबाईल व साहित्य असा एकूण 17,84,680/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ / प्रदिप खानसोळे, पोहेकॉ / गणेश राठोड, पोहेकॉ / संदिप वाघाडे व पोहेकों / गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.’खबर’ हेल्पलाइन वरुन माहिती द्या: अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.